सज्जन हो नमस्कार,
थोरामोठ्यांचे आशीर्वाद आणि दातृत्वाच्या हातांनी आम्हाला आधार दिला आणि २०१८ साली एक एकर जागेत शाळेच्या इमारतीच्या बांधकामाला आम्ही सुरुवात केली. पहिलीच्या वर्गाची मान्यता आणि शाळेची इमारत या दोन्ही गोष्टी हळू हळू पुढे सरकत होत्या आणि आव्हानांची यादी त्यापेक्षाही वाढत होती पण म्हणतात ना काळरात्रीनंतर कितीही भीती वाटत असेल तरी एक ऊर्जेचा किरण पृथ्वीतलावर उजेड घेऊन येतो. अगदी याच उक्तीप्रमाणे आमच्या शाळेला पंखांमध्ये बळ मिळालं शाळेची इमारत बऱ्यापैकी आकार घेत होती आणि तशी ज्ञानदीप शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही हळूहळू वाढत होती.
ज्ञानदीप शिक्षण संस्थेअंतर्गत आता दहावीपर्यंत शिक्षण तर आहेच परंतु, अकरावी-बारावीसह (कला, वाणिज्य आणि विज्ञान) सोबतच या तीनही पदवी अभ्यासक्रमाची मान्यता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्नतेने संस्थेला सावित्रीबाई फुले कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, औराळा आणि स्व. नारायणराव कर्डक कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, नागमठाण या नावाने दोन वेगवेगळी महाविद्यालये आकाराला आली आहे. काळाच्या गरजा वाढतील अशा अनेक गोष्टी त्यासोबत येत राहतील आणि संस्थेचा विस्तारही होत राहील परंतु आपल्यासारख्या सुजाण पालकांचे सहकाराचे हात सोबत नसतील तर संस्थेचा हा प्रवास कधीच शक्य झाला नसता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांचा सर्वांगीण विकास यासाठी ज्ञानदीप शिक्षण संस्था ही सदैव कटिबद्ध असेल याची खात्री बाळगावी.
आपला नम्र
प्रा.श्री. दीपक वारे
सचिव ज्ञानदीप शिक्षण संस्था